कोल्हापुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चोरीची एक ताजी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत.
शनिवारी सायंकाळी साधारण सहाच्या सुमारास गौरव चांडोले हे आपल्या मित्रासोबत व्हिनस कॉर्नर परिसरातील एका सराफ दुकानात खरेदीसाठी गेले होते. दुकानात सुमारे एक तासभर ते थांबले होते. परत आल्यानंतर पाहिले असता, त्यांना त्यांच्या मोटारीच्या मागच्या काचा फोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तपासणी केली असता मोटारीतील रोख एक लाख रुपये, एअर पॉड, चार्जर, सॅक असा 1 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसले. त्यांनी त्वरित शाहूपुरी पोलीस ठाण्यात याबाबत कळवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याद्वारे चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. संशयित आरोपी हा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
महिला आमदाराला अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवायची? पोलीस तपासात मोठा खुलासा
वाढत्या चोरीच्या घटनांचा नागरीक चिंताग्रस्त
कोल्हापूर शहरात मोटारीतील चोऱ्या, घरफोड्या, दुकानातील चोरी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यवर्ती भागातील व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी, मंगळवार पेठ, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशा घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका पुस्तक विक्रेत्याची 1 लाख 75 हजारांची रकम बसमधून चोरीस गेली होती. या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
पोलीस तपास आणि प्रतिबंधक उपाय
शाहूपुरी पोलिसांनी या घटनेच्या अनुषंगाने तपासाची गती वाढवली असून, परिसरातील सीसीटीव्ही आणि संभाव्य आरोपींवर नजर ठेवली जात आहे. चोरीतील मुद्देमाल आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जात आहे. वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवणे, सुरक्षेच्या उपाययोजना राबवणे आणि नागरिकांनी देखील सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. दरम्यान कोल्हापुरातील वाढत्या चोऱ्यांची समस्या गंभीर असून, नागरिकांनी सतर्क राहून प्रदेशातील सुरक्षेला हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

