डान्सर गौतमी पाटील हिने पीडित रिक्षा चालकाच्या कुटुंबियांबाबत धक्कादायक दावा केला आहे. आपल्याकडे 19 लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा गौतमी पाटील हिने केला आहे.
“मी त्या लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नाहीय. मला इकडून तिकडून खबरी येत आहेत. त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाही. त्यांचा एकच आकडा नाहीय. मध्येच ते 19 लाख म्हणणार. नंतर 20 लाख, आता 10 लाख म्हणणार, असा त्यांचा आकडा आहे. माझ्या भाऊ लोकांपर्यंत आकडे येत आहेत आणि ते माझ्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. माझा मानलेला भाऊ आहे. त्याच्याकडे पैशांची मागणी केली”, असा दावा गौतमी पाटील हिने केला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पोलिसांसोबत फोनवरील संभाषणाचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्याबाबत गौतमी पाटील हिला पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली. “योग्य की अयोग्य मला ते सांगता येणार नाही. मी एवढंच सांगते, ज्यावेळेस दादांनी समोर फोन लावला त्यावेळेस समोर जे पोलीस दादा होते त्यांनी खूप छान पद्धतीने काय विषय आहे ते समजावून सांगितलं. कदाचित त्यांना हे प्रकरण माहिती नसेल. म्हणून दादा असे बोलले असतील तर सांगता येत नाही”, असं गौतमी पाटील म्हणाली.
“मला कितीही कामे असतील तरी मी वेळ काढून गेले असते. मी सुद्धा गरिबीतून बाहेर आले आहे. संकट सगळी आली. मी देखील सामोरे गेली. मला वाईट वाटलं की, आपण मदतीसाठी हात दिला. पण समोरुन मला अनपेक्षित उत्तरे आली. त्यामुळे मी विचार केला की, मी जावून तिथे उपयोग नव्हता. म्हणून मी जाणं टाळलं. पण ज्यावेळेस त्यांनी माझ्यावर आरोप लावले त्यानंतर मी आज समोर आले. कारण या गोष्टी मला सहन होत नव्हत्या. मी त्यातून खूप डिस्टर्ब होते. मला खूप त्रास झाला म्हणून आज समोर आले”, असं स्पष्टीकरण गौतमी पाटील हिने दिलं.
“मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत आहेत. पोलिसांनी जे कागदपत्रे मागितले ते दिले. पोलिसांना माझी जी मदत लागेल त्यासाठी मी पूर्णपणे सहकार्य करणार. मी चूक केली नाही तर मी माघार घेणार नाही. पोलिसांनी मला सांगितलं की, ज्यावेळेस गरज लागेल तेव्हा ते मला बोलावून घेतील. त्यांनी सर्व चेक केलं. त्यातून त्यांना समजलं की, मी तिथे नव्हते. मी तिथे असले तरी मी गुन्हेगार नाही तरी तुम्ही मला का दोषी ठरवत आहात? मी तिथे असती तर त्या आजोबांना तिथे सोडून गेले नसते”, असं गौतमी पाटील म्हणाली.

