Palghar Crime: वाडा तालुक्यातील परळी येथील एका अल्पवयीन मुलीचा दलालाने अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुणाशी विवाह लावून दिला आणि लग्नानंतर तिला प्रचंड शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. पतीने चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करून तिला माहेरी पाठवले असून याप्रकरणी वाडा पोलिसांनी पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात आजही अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिली जातात हे वास्तव आहे. मात्र परजिल्ह्यातील व जातीतील मुलांसोबत एकप्रकारे केला जाणारा हा व्यवसाय धक्कादायक व कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली करणारा आहे. परळी गावातील एका मुलीचे अवघ्या 14 व्या वर्षी गावातील एका दलालाने मध्यस्थी करून संगमनेर तालुक्यातील जीवन गाडे नावाच्या तरुणाशी फूस लावून जबरदस्तीने विवाह लावून दिला. आई व सावत्र बापाने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र बदनामीच्या धास्तीने त्यांनी बळजबरीने या विवाहाला होकार दिला.
लग्नाच्या काही दिवसांनी अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यावर सरकारी दवाखान्यात नोंदणी करण्यासाठी पतीने वयात बदल करून तिचे खोटे आधारकार्ड बनविले. परळी, वाडा व पुढे जव्हार येथे अखेर या मुलीची प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर पती जीवन याने आपल्या पत्नीचा प्रचंड छळ सुरू केला. मारहाण, शिवीगाळ व उपासमार याला कंटाळलेल्या या मुलीवर तिचा पती चरित्रावरून संशय घेऊ लागला. 29 सप्टेंबरला अखेर आपल्या मामेभावासोबत ही मुलगी आपल्या घरी आली व तिने पोलिसात घडलेल्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली.
वाडा पोलिसांनी जीवन गाडे रा. सारसगावतळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, चुलत सासू शोभा गाडे, चुलत सासरा अमोल गाडे व परळी गावातील रवि कोर यांच्यासह एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाडा तालुक्यातील या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट मोडवर येणे गरजेचे असून दलालांच्या मार्फत तालुक्यातील किती मुली पीडित झाल्या आहेत यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी केली आहे.

