• Wed. Mar 11th, 2026

    कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान दोघांपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा?, पंढरपूरच्या मंदिर समितीपुढे मोठा पेच

    कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान दोघांपैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा?, पंढरपूरच्या मंदिर समितीपुढे मोठा पेच

    पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कार्तिकी एकादशीला कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान द्यायचा? असा पेच मंदिर समिती पुढे आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर : पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे एक मोठा पेच निर्माण झाला आहे. कार्तिक एकादशीला पूजेचा मान कुणाला द्यायचा? यावरुन मंदिर समिती धर्मसंकटात सापडली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. परंपरेनुसार, आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पूजेचा मान हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीला पूजा केली होती. तसेच राज्याला उपमुख्यमंत्री असतील तर परंपरेनुसार कार्तिकी एकादशीला पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. राज्यात सध्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कार्तिकी एकादशीला पूजेचा मान नेमका कुणाला द्यायचा? अशा संभ्रमात मंदिर समिती पडली आहे. हा पेड सोडवण्यासाठी आता महत्त्वाच्या घडामोडी घडल्याची माहिती आहे.

    मंदिर समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. कार्तिकी एकादशीला पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावर तोडगा काढण्यासाठी आता मंदिर समिती राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करणार आहे. कार्तिकी एकादशी 1 नोव्हेंबरला आहे. यावेळी कुणाला पूजेचा मान मिळतो? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    याआधीही अशी परिस्थिती उद्भवलेली

    विशेष म्हणजे याआधीदेखील अशी परिस्थिती उद्भवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यावेळी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्यात दोन उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा पार पडली होती. त्यानंतर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे दोघांपैकी एकाही उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान मिळाला नव्हता. त्याऐवजी विभागीय आयुक्तांच्या हस्ते पूजा पार पडली होती.

    यानंतर यावर्षी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन उपमुख्यमंत्री पूजा करु शकतात का? ते समजणार आहे. पण परवानगी मिळाली तर कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान मिळतो? ते पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा