मुंबईत मेट्रो वाहतुकीचा खोळंबा झालेला बघायला मिळत आहे. मुंबई मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिकांवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर आता वाहतूक सुरु झाली माहिती मिळत आहे. पण ही आजच्या दिवसातील दुसरी घटना आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो 2 अ आणि 7 हे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवर मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. पावर फेल्युअरमुळे हा सगळा प्रकार होत असल्याची चर्चा आहे. पण यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. अनेक मेट्रो ट्रेन या उशिराने धावत आहेत. काही ठिकाणी मेट्रोमधील एसी बंद झाल्याची तक्रार आहे. तर काही मेट्रो ट्रेन या स्थानकावर थांबून ठेवण्यात आल्या आहेत. मेट्रोची वाहतूक बंद झाल्याने अनेक स्थानकांवर गर्दी झाली आहे. प्रवासी गाडीची वाटत पाहत आहेत.
मेट्रो प्रशासनाने तांत्रिक बिघाड झाल्याचं मान्य करत सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. तांत्रिक बिघाड दूर झाल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. पण सर्व वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागेल. घाटकोपर वर्सोवा मार्गाची देखील मेट्रो वाहतूक सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सध्या गर्दीची वेळ आहे. अनेक जण आपली ऑफिसची कामे संपवून घराकडे निघाली आहेत. अशावेळी त्यांना मेट्रोच्या खोळंब्यामुळे मनस्ताप सोसावा लागत आहे. आता मेट्रोची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आहे. पण जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मेट्रोची वाहतूक खोळंबली होती.
मेट्रो प्रशासनाने दुपारच्या खोळंब्यावर काय सांगितलं?
दरम्यान, दुपारी झालेल्या मेट्रोच्या वाहतूक खोळंब्यावर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली होती. “आज दुपारी 14:44 वाजता, आचार्य अत्रे चौका स्थानकाच्या दिशेने जात असलेल्या ट्रेन मध्ये सांताक्रुझ स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून गाडीतील प्रवाशांना सांताक्रूझ स्थानकावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. ही गाडी सध्या सविस्तर तांत्रिक तपासणीसाठी बीकेसी लूपलाइनवर नेण्यात आली आहे. संबंधित गाडीची सेवा रद्द करण्यात आली असली, तरी इतर सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत”, असं प्रशासनाने सांगितलं होतं.
“प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रोटोकॉल तात्काळ पाळण्यात आली आहेत”, अशी देखील माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

