रत्नागिरीत एका सोने व्यापाऱ्याला मध्यरात्री रस्त्यावर लुटल्याचा प्रकार समोर आला. या आरोपींनी सिनेस्टाईल व्यापाऱ्याला लुटलं. या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
गेल्या बुधवारी 17 सप्टेंबर रोजी रात्री देवरुख साखरपा मार्गावर वांझोळे येथे धक्कादायक प्रकार घडला होता. संगमेश्वर येथील 63 वर्षीय सोने व्यवसायिक धनंजय गोपाळ केतकर यांना आरोपींनी लुटले होते. त्यांची मर्सिडिज गाडीमधन ते रात्री देवरुख साखरपा मार्गावरून घरी जात असताना हा प्रकार घडला होता. ते घरी जात असताना वांझोळे गावी रोडवर रात्री 10.30 ते 10.45 वाजेच्या सुमारास आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या गाडीला घासून पुढे उभी केली.
गाडी थांबवून धनंजय गोपाळ केतकर यांना काही लोकांनी गराडा घातला. अंगावर काहीतरी टाकून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यांचे गळ्यातील 3 सोन्याचे 16 लाख रुपये किमतीच्या चैन आणि खिशामधील रोख 20 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी त्यांना त्या ठिकाणाहून गाडीने नेऊन अन्य दुसऱ्या गाडीमध्ये बसवले. गाडीतील अनोळखी 5 इसमांनी “तुला सोडायचे किती पैसे देणार आणि कुठे देणार?” असे विचारले. यानंतर आरोपींनी धनंजय केतकर यांच्याकडे 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली.
आरोपींनी धनंजय केतकर यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारून, दरीत टाकून देऊ अशी धमकी दिली. हा सगळा थरार मध्यरात्रीच्या सुमारास सुरू होता. यानंतर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वाटुळ गावी काळोख्यातच या व्यापाऱ्याला सोडून देण्यात आले. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात सोने व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून 10 जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी यांच्याकडूनही तपास सुरू केला. पोलीस हवालदार विजय आंबेकर यांना मिळालेल्या तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. तपास पथकांनी गुन्ह्यातील दोन आरोपींना बदलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर या गुन्ह्यातील सहभागी दोन आरोपींना पनवेल, नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यात मिळून आलेली एक स्कॉर्पिओ वाहन, 5 मोबाइल हँडसेट, आणि 1,20,000 रोख रक्कम असे मिळून एकूण 6 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयात आज बुधवारी हजर केल्यावर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
या दरोडेच्या गुन्ह्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 104/2025, बी.एन.एस 2023 चे कलम 309 (4), 310 (1), 311, 142(2), 127(2), 115(2), 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्यासमवेत संदीप ओगले, पांडुरंग गोरे,नितीन डोमणे, विनायक राजवैद्य, विक्रम पाटील,गणेश सावंत,योगेश नार्वेकर, प्रविण खांबे, विवेक रसाळ, योगेश शेट्ये, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, बाळू पालकर, विजय आंबेकर, सत्यजित दरेकर आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी या तपासात सहभाग घेतला.

