महाराष्ट्राच्या राजकारणात उद्या काय घडेल हे आपण आज सांगू शकत नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा ते काय म्हणाले? ते जाणून घेऊयात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. याआधीच्या घडामोडींनी तर हेच दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे राजकारणात उद्या काय घडेल ते आपण आज सांगू शकत नाही हे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगत आहेत. राज्यातले राजकीय समीकरण बदलले असले तरी आगामी काळात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. तसेच त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. तसेच महायुतीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा सुरु असते. यामुळे आगामी काळात शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा एकत्र येतील का? त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येतील का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना ‘एबीपी न्यूज’च्या मुलाखतीत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
“मी आधीच क्रेडिट घेतलं आहे. त्यांनीदेखील मला क्रेडीट दिलं आहे. मी खूप खुश आहे. लोक म्हणतात, तुम्ही पक्ष फोडले. पण आम्ही फोडले नाही. लोक म्हणतात तुम्ही कुटुंब तोडले, पण आम्ही ते केलेलं नाही. पण आता कुणी म्हणत असेल की, तुम्ही कुटुंब जोडले तर त्याचं क्रेडिट मी नक्की घेईन. दोन्ही एकत्र राहावे. एकत्र निवडणूक लढावे. मला काही अडचण नाही”, असं देवेंद्र फडणवीस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर म्हणाले.
शिंदे-ठाकरे एकत्र येतील?
शिंदे-ठाकरे आणि पवार काका-पुतणे एकत्र होणार का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “असं काहीच होणार नाही. तुम्ही राजकारणाची वास्तविकता समजून घ्या. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नेहमी आमच्यासोबत राहतील. एनडीएत राहतील. राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा बनून राहतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत खरंच ‘फाईल वॉर’ सुरु? देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच उघडपणे म्हणाले…
‘राजकारणात उद्या काय होईल हे बोलू शकत नाही’, फडणवीसांचं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री होणार का? असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “जोपर्यंत इथे काम करायचं आहे तोपर्यंत इथे काम करणार. जेव्हा दिल्लीत काम करायचं सांगणार तेव्हा दिल्लीत काम करणार. जेव्हा सांगतील दोन्ही ठिकाणी काम करु नका तर मी स्वत:च्या घरी जाईन”, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच “राजकारणात पुढचा रस्ता कुणालाच ठाऊक नसतो. महत्त्वकांक्षेला काही महत्त्व नसतं. राजकारणात उद्या काय होणार आहे ते आपण बोलू शकत नाहीत. त्यामुळे तुमच्या गोष्टी जेवढ्या संक्षिप्त आणि ताब्यात ठेवणार तेवढं चांगलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा