• Mon. Jul 6th, 2026

    व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2025
    व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन – महासंवाद




    मुंबई, दि. १७ : शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधील विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.

    जात वैधता प्रमाणपत्राच्या अभावामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू नये, याकरिता ज्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही त्यांनी तातडीने संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), चे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याचे मुख्य समन्वयक, सुनील वारे यांनी केले आहे.

    राज्यात सुरु असलेल्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदतवाढ शासनाने दिली आहे. तथापि, अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही. संबंधित समित्यांमार्फत एसएमएस, ईमेल व पत्राव्दारे वारंवार सूचना दिल्यानंतरही अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह समित्यांशी संपर्क साधलेला नाही, असे दिसून आले आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, त्यांनी तातडीने संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधून आवश्यक दुरुस्ती करावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक यांनी केले आहे.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed