• Wed. Mar 18th, 2026

    ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 15, 2025
    ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




    मुंबई, दि. १५ : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले.

    ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे कार्यकारी संचालक जिओन्जीक ली, उपाध्यक्ष (वित्त) सारावनन टी, सहायक उपाध्यक्ष पुनीत आनंद, कार्तिक एल, वरिष्ठ व्यवस्थापक विनोद बनसोड आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देत आहे. ही बाब स्तुत्य असून या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे पथदर्शी ठरतील. या निधीतून कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत रस्ता सुरक्षा, चालक प्रशिक्षण आदींमध्ये काम करावे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण करीत कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती दिली. पुणे येथील प्रकल्पाच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीम, रस्ता सुरक्षा उपक्रम आदींचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

    0000

    निलेश तायडे/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed