महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी नवा जीआर जाहीर करुन आता केवळ 9 दिवस होत आहेत. असं असताना या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. या जीआर विरोधात तब्बल दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी ही चिंतेची बाब आहे.
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने मराठा समाजाच्या नव्या जीआर विरोधात पहिली याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत जीआर रद्द करा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित जीआर हा पूर्णपणे बेकायदा आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करण्यात यावा, असं म्हटलं आहे. याबाबत दुसरी याचिका ही वकील विनीत धोत्रे यांच्याकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षणाचा जीआर जाहीर करुन नऊ दिवस झाले आहेत आणि अवघ्या 9 दिवसांत जीआर विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत जीआरची अंमलबजावणी केली जाऊ नये, अशी देखील मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. तसेच तोपर्यंत कुणालाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ नये असं याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारे याचिकेकर्ते कोण?
मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारी पहिली याचिका ही शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेकडून करण्यात आली आहे. या संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांची ही संघटना 1996 मध्ये स्थापन झाली आहे. तसेच या संघटनेने ओबीसींसाठी काम केलं आहे. या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत आताच जाहीर करण्यात आलेला मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहेच, त्यासोबत 7 सप्टेंबर 2023, 31 ऑक्टोबर 2023 चे जीआर सुद्धा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पहिली याचिका दाखल करणारे मनोहर धोंडे नेमके कोण?
मनोहर धोंडे हे पेशाने प्राध्यापक होते. ते छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी कॉलेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते 2022 मध्ये निवृत्त झाले. त्यांनी 1988 मध्ये राजकारणात कामकाजाला सुरुवात केली. ते शिवसेनेत काम करत होते. ते 1988 मध्ये शिवसेनेचे मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांनी 1996 मध्ये शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेची स्थापना केली. यानंतर 2002 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावरर त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी लोह कंधार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. लिंगायत समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी काम केलं. तसेच 2024 मध्ये त्यांनी सेवा जनशक्ती पक्षाची स्थापना केली. त्याच पक्षाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूर
दुसरी याचिका दाखल करणारे विनीत धोत्रे काय म्हणाले?
वकील विनीत धोत्रे यांनी जीआर विरोधात दुसरी याचिका दाखल केली आहे. त्यावर त्यांनी आपली भूमिका देखील मांडली आहे. “उपसमिती ही कोण आहे? ह्यांच्याकडे ताकद आहे का? ताकद असेल तर सगळ्यांना द्या. ही संविधानिक नाही. तुम्ही आरक्षण द्या, पण असंविधानिक नाही”, असं वकील विनीत धोत्रे म्हणाले आहेत.

