Nanded MSEB Employee Abused : ‘भीक मागण्यासाठी मराठा समाज ओबीसीमध्ये आलाय. लाजा वाटायला पाहिजे’. जिल्हा परिषदेच्या एका महिला माजी सदस्याने वीजवितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील शिवीगाळ केली असल्याचं समोर आलं आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे. दरम्यान, या माजी महिला सदस्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीबाई पवार ह्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. मुदखेड तालुक्यात त्यांचं शेत आहे. त्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत पवार यांनी मुदखेड तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार बबन खराणे यांना काल सोमवारी सकाळी फोन केला आणि वीज खंडितबाबत विचारणा केली. जाब विचारत असताना माजी सदस्याने कंत्राटदाराला सुरुवातीला अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, वीज सुरळीत करण्याबाबत मला कोणीही सांगितलं नसल्याचं स्पष्टीकरण कंत्राटदाराने दिलं. त्यावरून जिल्हा परिषदेच्या भारतीबाई पवार ह्या चांगल्याच संतापल्या. दमदाटी करत अश्लील शिवीगाळ केली. शिवाय जात विचारत मराठा समाजाबद्दल अपशब्दाचा वापर देखील केल्याचा आरोप कंत्राटदार बबन खराणे यांनी केलाय.
महिला DYSPला दम दिल्याप्रकरणी अजितदादा एकटे, CM फडणवीस कमालीचे नाराज? म्हणाले, कोणताही नेता असो…
‘भीख मागण्यासाठी मराठा समाज ओबीसीमध्ये आलाय. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. घरी ये चप्पलने तोंड फोडते’, अशी धमकी देखील भारतीबाई पवार यांनी कंत्राटदाराला दिली. मी अशोक चव्हाण यांची कार्यकर्ता असल्याचं संभाषणात म्हटलं आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर मराठा बांधव आक्रमक होत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल सोमवारी रात्री विमानतळ पोलीस ठाणे गाठले. रात्री उशीरा विमानतळ पोलिसांनी बबन खराणे यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भारतीबाई पवार विरोधात कलम २९६, ३५३ (२), ३५१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून योग्य कारवाई करण्यात आली आहे. तेव्हा कोणी ही अफवा न पसरवू नये, असं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे. आज पोलिसांनी भारतीबाई पवार यांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे.

