• Fri. Mar 13th, 2026
    घरातून पती-पत्नी लेकासोबत निघाले, वाटेत काळाचा घाला; भरधाव जीपच्या धडकेत त्रिकोणी कुटुंबाचा अंत

    Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हृदयद्रावक घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव जीपने दुचाकीला धडक दिली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला. एका वर्षाच्या मुलासह पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका दुचाकीला भरधाव जीपने धडक दिली. दुचाकीवरुन पती-पत्नी व एक वर्षाचा चिमुकला सटाणा येथून वैजापूर मार्गे वाळूज औद्योगिक वसाहतीकडे जात होते. यावेळी रॉंग साईटने भरधाव जीपने येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एक वर्षाच्या चिमुकल्यासह पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात गंगापूर वैजापूर महामार्गावरील वरखेड येथे सकाळी घडला. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

    सजन राजू राजपूत – वय २८, शितल सजन राजपूत – वय २४, कृष्णकुंज सजन राजपूत – वय एक वर्ष, राहणार सटाणा, तालुका वैजापूर, हल्ली मुक्काम कमळापूर रोड वाळूज अशी मृत आई-वडील आणि मुलाचं आहे.
    Maharashtra TimesParbhani News : ई-पीक पाहणीसाठी तरुण शेताकडे निघाला, वाटेत अनर्थ घडला; नदीत बुडून तरुणाचा अंत, कुटुंबाचा आक्रोश
    दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सजन राजपूत यांना गावाकडून वाळूज येथे जायचं होतं. नियोजन ठरल्यानुसार सोमवारी सकाळी सजन हे पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाला घेऊन दुचाकी क्रमांक एम एच २० सी क्यू ०७६६ ने जात होते. सटाणा येथून काही अंतरावर गेल्यानंतर गंगापूर वैजापूर महामार्गावरील वरखेड फाटीपर्यंत त्यांची दुचाकी गेली. पुढे कालव्याजवळ पोहोचल्यानंतर बारामतीवरून वैजापूरच्या दिशेने रॉंग साईट आलेल्या एम.एच.१९ बीयू ४२१४ जीपने पती-पत्नीच्या दुचाकीला धडक दिली.

    मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!

    हा अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा चुराडा झाला. यात चिमुकला आणि पती-पत्नी दोघे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ रुग्णवाहिका बोलून अनिकेत मुळक, सागर शेजवळ यांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी टाहो फोडला. या घटनेनंतर शिल्लेगाव पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा