• Sat. Sep 19th, 2026

लोकसंवादातून वांढरी येथे कर्जमाफी व कृषी विषयक योजनांची माहिती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 18, 2026

चंद्रपूर, दि. १८ : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने वांढरी (ता. चंद्रपूर) येथे ‘लोकसंवाद–2026’ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली.

जिल्हा माहिती कार्यालय आणि वांढरी येथील नवयुवा गणेश मंडळाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) जयसिंग ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, पोलीस पाटील तानेबाई शेरकी , गणेश मंडळाचे उपाध्यक्ष वैभव कौरासे, सचिव कपिल शेळके, संभाजी येरगुडे, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या योजनांची माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी गजानन पवार यांनी विविध शेतकरी कल्याणकारी योजनांविषयी मार्गदर्शन केले. यात कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी उत्पादक कंपनी, फळबाग लागवड आणि शेततळे योजनेसह कृषी विभागाच्या विविध योजनांचा समावेश होता. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या व्याप्तीत बदल करण्यात आला असून भूमिहीन शेतमजूर तसेच महिला शेतकऱ्यांनाही यामध्ये लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अपघाती मृत्यू, सर्पदंश, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, विजेचा धक्का तसेच उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर यांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंटअंतर्गत लाभ तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ अशा तरतुदींचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले.

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed