Kalyan ST Bus Accident : कल्याण एसटी आगाराच्या बसेसच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी माळशेज मार्गे आळे फाट्याला निघालेल्या बसचा मुरबाडजवळ स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला. बस झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला, काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. यापूर्वी चाक निखळल्याने अपघात झाला होता, त्यामुळे बसच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज सकाळी कल्याण आगाराची ही बस सुमारे 20 ते 25 प्रवाशांना घेऊन माळशेज मार्गे आळेफाटा येथे निघाली होती. मात्र मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळून ही बस जात असताना अचानक बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली. आणि रस्त्याशेजारी झुडपांमध्ये असलेल्या झाडाला या बसने धडक दिली. ज्यामध्ये बसच्या उजव्या भागाचे काही नुकसान झाले आणि बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर वाहकालाही मुका मार लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Pune News : मुलाला आणायला निघालेल्या बापावर काळाचा घाला, भीषण अपघातात मन हेलावणारा अंत
मात्र सुदैवाने ही बस झाडाला धडकल्याने पुन्हा एकदा मोठा अपघात टळला. काही अंतरावर पुढे असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असता तर मग काहीही होऊ शकले असते. तर या अपघाताबाबत कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो होऊ शकला नाही.
दरम्यान काही आठवड्यांपूर्वीही कल्याण एसटी आगाराच्या बसचे पुढचे चाक निखळून अपघाता झाला होता. त्यापाठोपाठ आता आज स्टेअरिंग रॉड तुटून झालेला अपघाताचा विचार करता कल्याण आगारातील बसेसच्या देभभाल दुरुस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देखभाल दुरुस्तीचे काम करूनही असे अपघात होत का आहेत ? की बसेसच्या देखभाल दुरुस्ती कामामध्ये काही तडजोड केली जात आहे का? आणखी किती मोठा अपघात झाल्यावर की प्रवाशांचा बळी गेल्यावर एसटी प्रशासन जागे होणार आहे असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.

