समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. आरोपींनी रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवत एका मेकॅनिकला लुटलं होतं. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. अखेर पोलिसांनी आरोपींना सिनेस्टाईल अटक केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : समृद्धी महामार्गावर मध्यरात्री आयशर वाहन दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळले आणि तांत्रिक विश्लेषणासह चार दिवस तपास केल्यानंतर टोळीतील चौघांना थेट सापळा रचून जेरबंद केले. आरोपींकडून चोरीचे दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या घटनेने निर्माण झालेली खळबळ उडाली होती. 8 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 508 येथे अभिषेक मच्छिंद्र गायकवाड हा आयशर वाहन दुरुस्त करत होता. त्याचवेळी सहा जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या साथीदाराला घेरले. हातातील चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेत टोळी अंधाराचा फायदा घेत पसार झाली.
150 सीसीटीव्ही फुटेज तपासले
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली.
Pune News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रियकराला कॅफेत नेले; चुंबन घेतलं, 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
घटनास्थळापासून आरोपी ज्या मार्गाने पसार झाले असतील, त्या संपूर्ण परिसरातील हालचालींचा माग काढण्यात आला. महामार्गावरील 150 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले आणि गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. चार दिवसांच्या सलग तपासानंतर 11 सप्टेंबर रोजी पोलिसांना आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.
कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ, कोकमठाण गावच्या शिवारात दरोड्यातील आरोपी दुचाकीसह थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने कारवाई करत धनंजय उर्फ धनु प्रकाश काळे (वय 27), स्वप्नील संतोष भारूड (वय 20), प्रशांत जालिंदर भारूड (वय 20) आणि शिवरंजन राजेश शिंदे (वय 22) या चौघांना ताब्यात घेतले.
चौकशीत टोळीचा पर्दाफाश
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता दरोड्यात आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. चंदू नारायण तहकीक (रा. सावळीविहीर, ता. राहाता) आणि त्याचा एक साथीदार अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरीचे दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख आणि 80 हजार रुपये किंमतीची हिरो प्लेंडर दुचाकी असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
Pune Crime : 500 सीसीटीव्ही तपासले, दिवसरात्र तपास, अखेर 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त, सराईत चोरटे जेरबंद
सराईत गुन्हेगारांचा समृद्धी महामार्गावर धुमाकूळ
या कारवाईतील धनंजय उर्फ धनु काळे आणि स्वप्नील भारूड हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. धनु काळे याच्यावर दरोडा, चोरी, घरफोडी, मारहाण यासह विविध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर स्वप्नील भारूड याच्याविरुद्धही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत.
समृद्धी महामार्गावर वाहनांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 150 कॅमेऱ्यांचे फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत दरोडेखोरांना पकडण्यात आले आहे. फरार असलेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा