BJP Chandrapur News : चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत भाजपाच्या मंडपात दोन गट आमनेसामने आले. आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार यांच्यात स्वागत मंडपावरून वाद झाला. यामुळे गणेश भक्तांना त्रास झाला. भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
कधी पक्षातील शिस्तीसाठी ओळखला जाणारा भाजप पक्षातील वादाचे लक्तरे आता चंद्रपूरचा मार्गांवर टांगले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कधी अहिर- मुनगंटीवार वादाची चर्चा होती. आता मुनगंटीवार-जोरगेवार वादा ने डोकं वर काढल्याची चर्चा राजकारणात आहे.
भक्ती की अट्टाहास..
खरंतर भक्ती ओठातून नव्हे तर पोटातून यायला हवी. घराघरात, गावागावात गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. प्रत्येक दिवस गणेश भक्त भक्तीत न्हाहून निघत होते. चंद्रपुरात मात्र भक्तांच्या स्वागतासाठी उभा करण्यात येणाऱ्या मंडपावरून वाद निर्माण झाला होता. याला भाजपाची भक्ती समजायची की अट्टाहास याची चर्चा आता राजकारणात रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
शहरात अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकी मुख्य मार्गांवरून काढल्या जातात. या मिरवणुकांचा स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी मंडप उभारले जातात. या मंडप स्पर्धेवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. मुख्य रस्त्यावरील लोकमान्य टिळक शाळेजवळ भाजपचे स्वागत मंडप उभारण्यात येणार होते. या जागेवरून आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे समर्थक आमनेसामने आले होते. या प्रकरणामुळे भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला. विशेष म्हणजे हा वाद महापालिकेपासून रस्त्यापर्यंत पोहोचला. मंडपाच्या ठिकाणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही घटनास्थळी पोहोचावे लागले.

