मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंना शिवाजी पार्कात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेही व्यासपीठावर दिसू शकतात. शिवसेना उबाठाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी या संदर्भातील स्पष्ट संकेत दिले आहेत. दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरेंना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं, असं अहिर म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अहिर यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य भेटीवर सूचक विधान केलं.
गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तोच धागा पकडून सचिन अहिर यांनी या विषयावर भाष्य केलं. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं ही केवळ २ पक्षांची गरज नसून ते राज्यासाठी आवश्यक आहे. ही जनभावना आहे. आता गणेशोत्सव संपल्यावर पितृपक्ष सुरु होत आहे. दसऱ्याला चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे,’ असं सूचक वक्तव्य अहिर यांनी केलं.
सध्याची परिस्थिती काय आहे, त्याला कसं सामोरं जायचं, याविषयी आमचे नेते दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करतील. दसरा मेळाव्यामधून कार्यकर्त्यांना दिशा द्यायची असते. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक अंगांनी हा मेळावा महत्त्वाचा आहे. दसरा मेळाव्याला दोघे बंधू व्यासपीठावर एकत्र येतील का ते माहिती नाही. पण आम्ही त्यांना आमंत्रित करु शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. आमच्याप्रमाणेच त्यांचाही मेळावा असतो. त्यामुळे तेदेखील आम्हाला आमंत्रित करु शकतात, असं अहिर पुढे म्हणाले. शिवतीर्थावरील यंदाचा दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल, असं सूचक विधान अहिर यांनी केलं.

