OBC Subcommittee : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात नाराजी पसरल्याने, सरकार ओबीसींच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असतील, तर छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यासह आठ मंत्री सदस्य असतील. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी ही समिती धोरण तयार करणार असल्याचे वृत्त आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, सरकार ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणार आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत आणि छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह आणखी आठ मंत्री समितीचे सदस्य असणार आहेत.
ओबीसींच्या नाराजीचा धसका: मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, आजच GR काढणार; डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न?
ओबीसी समाजाच्या विरोधानंतर सरकार हे पाऊल उचलताना दिसत आहे. ओबीसींमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. यातच मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार एकप्रकारे सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. ओबीसींना दिलासा देण्यासाठी सरकार विकासात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ओबीसींच्या विकासासाठी उपसमिती गठीत करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाबाबत कार्यक्रम आखण्यात येणार आहेत. यांसंबंधित योजनांबाबत ही समिती कामकाज पाहणार असल्याचे वृत्त आहे.
समितीचे कोण कोण असणार सदस्य?
भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद असणार आहे. तर या समितीत भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे समितीचे सदस्य असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

