मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील ओबीसी नेते आणि ओबीसी संघटनांना मराठा आरक्षणाच्या नव्या जीआर विरोधात आंदोलन करु नये, असं आवाहन केलं आहे. या जीआरमधील काही शब्दांवरुन संभ्रम निर्माण झाल्याचं भुजबळ म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या नव्या जीआर विरोधात आंदोलनं करणं थांबवा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. ओबीसी समाजाने आक्रमक आंदोलन करु नये, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे. राज्य सरकारच्या जीआरमधील काही शब्दांवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अभ्यासकांसोबत आपली चर्चा सुरु आहे. तसेच या जीआर विरोधात आपण मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत. त्यामुळे या विरोधात कुणीही रस्त्यावर येऊन आंदोलन करु नये, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“ओबीसी आणि मागासवर्गातील आमच्या अनेक संघटना, आमचे नेते यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी, कुठे कलेक्टर किंवा इतर ठिकाणी निवेदनं दिली. काही ठिकाणी मोर्चे काढत आहेत. अनेक ठिकाणी शासन निर्णय फाडत आहेत. हे सगळं सुरु आहे. मी आपले इतर ओबीसींचे जे नेते आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. आपल्याला कल्पना आहे की, आता गणेशोत्सव सुरु आहे. दोन दिवसांत विसर्जन वगैरे सुरु होणार आहे. अनेकांच्या घरी गणपती असतात. अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमात असतात. काही ठिकाणी ओबीसींचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे उपोषण देखील सुरु आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“माझी या सर्वांना विनंती आहे, आम्ही सर्वजण येथे अनेक जे कायदेतज्ज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांना हे सर्व कागदपत्रे देऊन या संदर्भात जे काही संभ्रम आहे, त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत. माहिती घेत आहोत. आवश्यक असेल तर निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करुन कदाचित सोमवार-मंगळवारपर्यंत हायकोर्टात जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. पण त्या संदर्भात आपल्याला अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची आवश्यकता भासते. आम्ही सर्वजण मुंबईत वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत”, असंही भुजबळ म्हणाले.
“माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, आपण शांतपणे जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात आपली पत्रके देणं आणि ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही, अशी मागणी करा. हे काम अनेकांनी केलं आहे. आणखी काही ठिकाणी हे काम केलं नसेल तर त्यांनी ते करावं. बाकीचे आंदोलनाचे जे प्रकार आहेत, कुणी उपोणष करत आहेत, कुणी शासन निर्णय फाडत आहेत, असं मी पाहतोय. मला असं वाटतं की, तूर्त आपण या सर्व गोष्टी त्वरित थांबवाव्यात”, असंही आवाहन भुजबळ यांनी केलं.
“आम्ही याचा अभ्यास करुन योग्य तो निर्णय घेणार आहोत. ओबीसींचं नुकसान होत असेल, असं आमच्या वकिलांनी सांगितल्यानंतर निश्चितपणे आमची हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे. त्यासाठी दोन दिवस थांबण्याची आवश्यता आहे. आपण सर्वांनी तूर्त शांत राहा. फक्त निवेदन देण्यापलिकडे काही करु नका. उपोषणे सोडावेत. शांततेने आपलं म्हणणं सरकारी दरबारी निवेदनाने द्यावं आणि वाट पाहावे. सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय आपल्यास निश्चितपणे कळवेन”, असा मेसेज छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना दिला आहे.

