मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी येण्याची इच्छा व्यक्त केली. पण काही कारणास्तव त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
यावर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “माझी विनंती अशी आहे की, तुम्ही आता उपोषण मागे घ्या. अंमलबजावणी आपण सुरु केली की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घडून आणू”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. त्यावर जरांगे यांनी “नंतर मी जवळ येऊ देत नसतो. सर्व काम तुम्ही केलं”, असं प्रत्युत्तर दिलं.
“माझं पूर्ण ऐकूण घ्या. आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जीआर तुम्हाला दिलेले आहेत. निर्णय केले, निर्णय प्रक्रिया सुरु केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंच फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं, त्यामुळे मला हे करता आलं. त्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली. माझ्या या गेल्या 3 दिवसांपासूनच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने पाठपुरावा करत आहेत. माहिती घेत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंदेखील तेवढंच सहकार्य लाभलं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो जरांगे पाटील साहेब”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
“हे अगोदर ठरलं नव्हतं. आता तीनही नेते सध्या कामा निमित्त मुंबईबाहेर आहेत. माझी विनंती अशी आहे की, आपण आता उपोषण सोडलं की, तीनही नेत्यांची पुन्हा भेटही घालून देऊ”, असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. “ते जरी आले तरी आम्ही उपोषण तुमच्याच हातानी सोडणार. त्याने मराठ्यांमध्ये त्यांच्याबद्दल असणारी नाराजी देखील निघून जाईल. त्यामुळे त्यांनी तिघांनी यावं. ते नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांगतो”, असं जरांगे पाटील म्हणाले.
“मंत्रिमंडळाचा उपसमिचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मलाच सर्व अधिकार दिले होते. मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य होतो. हा मुख्यमंत्र्यांचा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
यानंतर मंत्री उदय सामंत यांनी देखील मनोज जरांगे यांची मनधरणी केली. “आम्ही जे काही निर्णय घेतो त्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने घेतो. आपल्या प्रकृतीचा विचार करता आपण उपोषण मागे घ्यावं”, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.
“आमचं एवढंच म्हणणं होतं की, त्यांच्यातील आणि आमच्यातील नाराजीची कटुता दूर व्हावी. त्यांनी यावंच म्हणून मी बोलत नाही. मी कोतवालाच्या हाताने उपोषण सोडवायला बसलो आहे. एक कटुता असते. ती कमी व्हावी. नाही आले तर नाही. काही अडचण नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

