Manoj Jarange Protest Allowed for One Day : मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे. त्याचदरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मैदानात एकच जल्लोष केला आहे.
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन
मनोज जरांगेंच्या उपोषणाला महाविकास आघाडीतील अनेक नेते, आमदार व खासदार भेट देऊन आपली भूमिका मांडत आहेत. शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासोबत चर्चा केली. आजच्या भेटीत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणंही करुन दिलं. दीड ते 2 मिनिटे मनोज जरांगे पाटील यांचं उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? काय बोलणं झालं? याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आंदोलनादरम्यान मुंबईत हृदयद्रावक घटना, पुन्हा एका मराठा आंदोलकाचा करुण अंत
शिंदे समितीची मनोज जरांगेंशी चर्चा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपला निर्धार कायम ठेवला आहे. सरसकट मराठे कुणबी असल्याचा जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पहिल्या दिवशी सरकारकडून कोणत्याही प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर आझाद मैदानात झालेल्या गैरसोयीवरूनही बरीच सडकून टीका झाल्यानंतर आज सकाळी बीएमसी प्रशासनाकडून आझाद मैदान परिसरामध्ये तातडीने सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री न जाता शिंदे समितीला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात पाठवण्यात आलं. यावेळी समितीकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेत सरकार कोणकोणत्या बाबींवर काम करत आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला.

