Pune Crime News : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. सातारा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराचा एन्काऊंटर केला आहे. या आरोपीने पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव बचावासाठी त्याच्यावर गोळीबार करावा लागला.
मूळचा खटाव तालुक्यातील असणारा लखन भोसले याच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरीचे आणि गुन्हे दाखल आहेत. त्याने दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून साताऱ्यामध्ये एका महिलेची सोनसाखळी हिसकावली होती. त्यानंतर इतर दोन आरोपींसह तो पसार झाला होता. साताऱ्यातून पसार झालेला लखन भोसले हा पुण्यात आला होता. त्याला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचं एक पथक पुण्याला रवाना झालं होतं.
लखन भोसले हा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर भागात असण्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आज सातारा पोलिसांचं एक पथक पुण्यातील शिक्रापूर भागात दाखल झालं. लखन भोसलेसह तीन आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. लखन भोसले याला पकडायला गेलेल्या पोलिसांवर त्याने चाकूने हल्ला केला.
लखन भोसले याने हल्ला करताच पोलिसांनी बचावासाठी गोळी झाडली. ही गोळी लखन भोसलेच्या कमरेला लागली आणि यामध्ये तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लखन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दरोडे, जबरी चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?
सातारा शहर पोलीस ठाणे (गु. र. नं. 721/25, BNSS 304(2)) च्या तपासासाठी पोलिसांची टीम शिरूर आणि शिक्रापूर पोस्ट हद्दीत आरोपींचा शोध घेत होती. या शोध मोहीमेदरम्यान शिक्रापूरमधील मलटण फाटा परिसरात सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल दौलप्पा केरे (रा. झेंडेश्वरी पायथा, आसगाव, सातारा) आणि लखन पोपट भोसले (रा. वडगाव पुसावले, सातारा) दिसले.
पोलिसांनी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भुजबळ नगर, मलटण फाटा, शिक्रापूर परिसरात त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी आरोपी लखन भोसले याने पोलिसांवर हल्ला करत पोलीस हवालदार सुजित भोसले यांच्या छातीवर आणि हातावर तसेच तुषार भोसले यांच्या हातावर चाकूने वार केला. त्यामुळे बचावासाठी पोलिसांनी फायरिंग केली. या फायरिंगमध्ये आरोपी लखन भोसले गंभीर जखमी झाला.
जखमी आरोपी आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ जवळील सूर्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर आरोपी लखन भोसले याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मयतास पुण्याच्या ससून हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

