Mumbai Rain Update : गणेशोत्सवात कोकण आणि मुंबईत पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग आणि गोव्यात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही दिवसांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. तर पालघर आणि ठाण्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
ओडिशाचा दक्षिण किनारा आणि लगतचा भाग येथे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले आहे. या प्रणालीशी निगडीत चक्रीय वातस्थिती तसेच पूर्व-पश्चिम वाऱ्यांची प्रणालीही निर्माण झाली आहे. पश्चिम आणि वायव्य दिशेकडून वारे वाहत असून याचा एकत्रित परिणाम म्हणून गोवा आणि कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय झाला आहे. रत्नागिरी केंद्रावर बुधवार ते गुरुवार सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत ९५ मिलीमीटर, संगमेश्वर येथे ८१ मिलीमीटर, दोडामार्ग येथे १७२ मिलीमीटर, कुडाळ येथे १०६ मिलीमीटर वैभववाडी येथे १११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोव्यामध्ये काणकोण येथे १५४ तर केपे येथे १८० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. पावसाचा जोर गुरुवारीही कायम राहिल्यानंतर दक्षिण कोकणासाठी भारतीय हवामान विभागातर्फे ऑरेंज अलर्ट देण्यात आला. महामुंबई परिसरात ठाणे, डोंबिवली येथे सकाळच्या सुमारास जोरदार सरींची उपस्थिती होती. मुंबई परिसरामध्ये दिवसभरात एखाद्या ठिकाणी मोठी सर होती. मुंबईमध्ये कुलाबा येथे केवळ ०.२ तर सांताक्रूझ येथे २.८ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईमध्ये सोमवारपर्यंत मध्यम सरींचीच शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. शुक्रवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी मध्यम सरींची शक्यता असून सोमवारी पालघर जिल्ह्यात पुन्हा एखदा पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

