मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. त्यांच्या या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. मुंबईत सध्या गणेशोत्सवाची लगबग आहे. येत्या 27 मार्चपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशा काळात मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन आले तर मोठा जनसमुदाय मुंबईत दाखल होऊ शकतो. यामुळे यंत्रणेवर फार मोठा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांचं आंदोलन स्थगित व्हावं, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी आज बीडमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्या सरकारने मराठा समाजासाठी जे कार्य केलं आहे ते सर्वांना माहिती आहे. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ते आरक्षण सुरु आहे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मराठा समाजाकरता शिक्षणाची व्यवस्था केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना राहण्याकरता आपण त्यांना भत्ता देण्याची योजना सुरु केली आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाज जास्तीत जास्त आला पाहिजे यासाठी सारथी सारख्या संस्थेसोबत आपण काम केलं. त्यामुळे अनेक IAS अधिकारी सारथीच्या माध्यमातून तयार केले आहेत. सारथीच्या माध्यमातून अनेक MPSC चे विद्यार्थी तयार केले आहेत”, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. पुढेही आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मांडली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा