मंत्री नितेश राणे यांनी नुकतंच कणकवलीत मटका अड्ड्यावर धाड टाकली. यानंतर आता नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठा इशारा दिला आहे.
उगाच खासदार नारायण राणेंचं आमचं नाव बदनाम करू नका तुमचे पहिले सगळ्यांचे अवैध धंदे बंद करा नाहीतर आता जरा थांबा आणि बघा ‘आगे आगे देखो होता है क्या ‘ अशा शब्दात नितेश राणे यांनी सुनावले आहे. यांवर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांकडून कारवाई न झाल्यास पुढील काळातही अशा स्वरूपाच्या थेट धाडी घातल्या जातील, असे स्पष्ट संकेत नितेश राणे यांनी दिले आहेत.
‘…त्यासाठी लागेल तो धोका पत्करायला तयार’
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आणि भावी पिढीचे भविष्य हे आपलं ध्येय आहे. यासाठी लागेल तो धोका पत्करायला मी तयार आहे. गांजा, चरस, मटक्याचे धंदे, अंमली पदार्थ, अवैध वाळू चोरी या सगळ्याला यंत्रणेतील काहींचा आशीर्वाद आहे. त्यांना यंत्रणा मदत करते म्हणून त्यांना ताकद मिळते हे लक्षात घ्या. या सगळ्याची माहिती आपल्याकडे आहे. त्यांना जमलं नाही तर आपण ते करू असं थेट विधान करत पालकमंत्री नितेश यांनी महसूल आणि पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.
अंमली पदार्थ गोव्याला जवळ असलेल्या सावंतवाडी पर्यंत होते. ते आता खारेपाटण पर्यंत आले आहेत. जिल्ह्यात हे सगळं कोणत्या मार्गाने यंत्रणेतून येत या सगळ्याची माहिती आपल्याला आहे. आपल्याला जिल्ह्यातील भविष्यातील पिढी वाचवायचे आहे. आम्ही विकासकामे करत आहोत. उद्योगधंदे आणत आहोत. त्यामध्ये रोजगारासाठी आपली पिढी जागा व्यसनाधीन झाली. चुकीच्या मार्गाने गेली तर मग नोकऱ्या उद्योग कोण करणार? असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
परप्रांतीयांकडून अलीकडेच काही बाजारपेठांमध्ये फेरीवाल्यांनी बसवलेले बस्तान यावरही राणे यांनी प्रशासनाला सूचक इशारा दिला आहे. कणकवली येथे घातलेल्या अड्ड्यावर धाडप्रकरणात दोन ते तीन पोलिस अधिकारी कर्मचारी घरी जातील असाही इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
‘मी बिन गर्दीचा पोलीस जिल्ह्याचा पालक’
आपल्याकडे या सगळ्या अवैध धंद्याची माहिती आहे पण आपण यंत्रणेला मुदत देत आहोत त्यांनी नाही केली तर मी बिन वर्दीचा पोलीस आहे. जिल्ह्याचा पालक आहे, अशा शब्दात राणे यांनी सुनावले आहे. या सगळ्याचा बिमोड केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
गोड बातमी दोन-तीन दिवसात देणार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई ते कोकण ही रो-रो सेवा येत्या दोन-तीन दिवसात तुम्हाला गोड बातमी द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. यासाठी जवळपास 38 ते 40 परवानग्या लागतात. त्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबर आपल्या दररोज बैठका सुरू आहेत. रो -रो सेवा सुविधा दराबद्दल मिळालेल्या परवानगी, सगळी तांत्रिक माहिती मुख्यमंत्री महोदय याबद्दल सविस्तर माहिती देतील. त्यांचा तो अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

