Ratnagiri Politics : रत्नागिरीतून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप रत्नागिरीत मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. त्याचा एक भाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बडा नेता आज भाजपात प्रवेश करत आहे. त्यामुळे कोकणाच्या राजकारणात मोठा भूकंपा होताना दिसत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा अवघ्या 6800 मतांनी पराभव झाला होता. गेले काही दिवस ते नाराज असल्याचे चर्चा होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही भेट देऊन त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशाची घोषणा नितेश राणे यांच्या दौऱ्यात करण्यात आली. याच दौऱ्यात राणे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर लढण्याचा असून तसेच स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
चिपळूण मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा होता. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असलेले शेखर निकम यांच्या ताब्यात गेल्यापासून हा मतदारसंघ गेले दोन टर्म राष्ट्रवादीकडे राहिला आहे. मात्र आता याच मतदारसंघात भाजपने तयारी सुरू केली आहे. 2029 साली होणार्या विधानसभा निवडणुकीचे प्रशांत यादव यांना पुढील मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शब्द दिला जाण्याची शक्यता आहे. त्याआधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रशांत यादव यांनाही आपला करिष्मा दाखवावा लागेल हेही निश्चित आहे.
कोण आहेत प्रशांत यादव?
वाशिष्ठी उद्योग समूहाचे चेअरमन प्रशांत यादव हे उद्योजक आहेत. ते गेली काही वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशांत यादव वयाच्या २५ व्या वर्षी चिपळूण खेर्डी गावच्या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले होते. उपसरपंच आणि सरपंचपद भूषविताना तसेच जवळपास 15 वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत. काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून 2018 ते 2024 या कालावधीत काँग्रेसला बळ दिलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.
प्रशांत यादव 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांचा 6 हजार 800 मतांनी पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क ठेवला आहे. आता त्यांनी भाजपा प्रवेश निश्चित केला असून आज हा पक्ष प्रवेश होत आहे. यासाठी त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता या राजकीय घडामोडीनंतर आगामी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत भाजपची काय भूमिका असेल हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

