Dharashiv Rain News: धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती आणि घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज दौऱ्यावर होते. त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून, नुकसान भरपाई लवकर देण्याचे निर्देश दिले आहेत.
पत्रकारांनी विचारलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, “मी शेतकरी पुत्रच आहे. माझा जन्म देखील शेतकरी कुटुंबातच झाला आहे. आज मी उठल्यावर मला शेती दिसते आणि झोपताना देखील शेती दिसते. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, या माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माहिती आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीची जाण मला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात योग्यवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे निर्णय घेतील,” असं भरणे यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रतारणा, फितुरी, जयंत पाटील यांनी भर मंचावर डिवचलं, अजित पवार म्हणाले…
धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
अचानकपणे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. काही गावांमध्ये जनावरे दगावल्याच्या आणि घरांचेही नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंबंधीही पंचनामे करण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.
“शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार”
शेतकऱ्यांचे दुःख ऐकून घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचंही म्हटलं आहे. याचबरोबर, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल, असे आश्वासन भरणे यांनी दिले.

