• Sun. Jun 14th, 2026

    पाईट-खेड येथील अपघात दुर्दैवी; अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत- उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2025
    पाईट-खेड येथील अपघात दुर्दैवी; अपघातग्रस्तांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत- उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद




    मुंबई, दि. ११ : पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली करुन मृतांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली आहे.

    अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.

    शोक संदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की, पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकट काळात अपघातग्रस्त व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *