Jitendra Awhad Angry : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला. “कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टच्या दिवशी मांसविक्री बंद केली तर त्या दिवशी मी स्वत: कल्याण डोंबिवलीत जावून मटन, मच्छि खाणार. हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं चॅलेंज जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
“देशाला स्वतंत्र मिळाले त्याच दिवशी आमचं स्वतंत्र हिरावून घेत आहात. हा काय तमाशा? कल्याण डोंबिवलीत बहुजन समाजाला विरोध करण्यात येतोय. माझा तर विचार आहे त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवणार. महाराष्ट्र शासनाने इतकंच करावे. तारीख जाहीर करावी. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं, आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली
“आदेश काढणारी ही गायकवाड बाई कोण आहे? तिला कोणी अधिकार दिला आहे? शासन नावाचं काय आहे की नाही? लोकप्रतिनिधी नाही, तिकडे आयुक्तांनी बाहेर येऊन त्यांची भूमिका काय हे सांगावं. शासनाने कल्याण, मुंबईमध्ये श्रीखंड पुरी खावी असे आदेश आहेत का?”, असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केले.
‘त्यांच्या बापाच्या अंगात दम असेल तर…’
“पुण्यात हिंदू संघटनेच्या नावाने मंडळ यात्रेवर बंदी आणायचे सांगत आहेत. त्यांच्या बापाच्या अंगात दम असेल तर शासनाला सांगावं मंडळ यात्रेवरती बंदी आहे. माझं आव्हान आहे, आयुष्यभर तुम्ही छळले, बाबासाहेब आले म्हणून आम्ही शिकलो. तुमच्या हातात राज्य व्यवस्था असती तर जातीप्रमाणे काम करावे लागले असते. आमच्यातला कोणी मोठा अधिकारी झाला नसता”, असं आव्हाड म्हणाले.
“हीच पुण्यातली माणसं, फुलेंच्या चित्रपटाला विरोध केला. त्यांना दगड मारली तर तुम्हाला आता वाईट का वाटतं? हाच तो सनातनी मनुवाद, देशाला आणि महाराष्ट्राला भ्रष्ट करत आहे. आम्ही बहुसंख्यांक, आमच्या यात्रेवरती बंदी, यांना शासनाने परवानगी देऊ नये. शासनाकडे चालते तर तुम्ही जाऊन बसा आणि शासनात हिंमत असेल तर बंद करून दाखवावे”, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
“आयुष्यभर ओबीसीला विरोध केला. मंडळ आयोगाला विरोध केला. अजून खदखद आहे, ती खदखद या पिलावडमुळे बाहेर निघतात”, अशी टीका त्यांनी केली. “भाजप आणि आरएसएसची टेस्ट आहे. ते आधी दगड मारून बघतात. पाण्यात दूरवर शिंतोडे किती उरतात ते बघतात. उडाले आणि लोकांनी विरोध केला तर ते बोलतात असं काही नाही. नाही उडाले तर दुसऱ्या वेळेला ती बंदी कायम करतात”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा”, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. “मी समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो. मी स्वतः कल्याण डोंबिवलीमधील कोणाच्या तरी घरी जाऊन मटन मच्छी 15 ऑगस्टच्या दिवशी जेवणार. तुमच्यात हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा”, असा मोठा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

