राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिला. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींच्या भेटीनंतर पवारांना हे कसे आठवले, असा सवाल त्यांनी विचारला. विरोधक जनतेत बोलतात, पण आयोगासमोर साक्ष द्यायला तयार नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.
मुंबईमध्ये माध्यामांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला हे लक्षात येत नाही पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण का आली. राहुल गांधी अनेक वर्षे ईव्हीएम बद्दल बोलत होते. तरी शरद पवार आतापर्यंत कधीच बोलले नव्हते. किंबहुना शरद पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्ट भूमिका घेतली होती की, ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे. आता अचानक बोललेत म्हणजे राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसत आहे. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करुन त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशाचप्रकारची अवस्था पवार साहेबांची झाली नाही ना? अशा खोचक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
Sharad Pawar : राहुल गांधींच्या मतचोरीविषयीच्या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा, भाजपने मध्ये पडण्याची गरज नाही, आम्हाला…
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तरीही भारताएवढ्या मुक्त आणि पारदर्शक निवडणूका कुठेच होत नाहीत. ही सर्व मंडळी जनतेत बोलतायत, पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर हे कोणीच जात नाहीत. निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. संसदेत शपथ घेतली हे सुप्रीम कोर्ट मध्ये सांगितलं. आम्ही शपथपत्र देणार नाही. कारण आम्ही संसदेत शपथ घेतली हे न्यायालयात सांगितलं तर चालेल का?
विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले, न्यायालयीन प्रकरणात शपथपत्र मागितलं जातंय तर तु्म्ही शपथपत्र का देत नाही. तुम्हाला माहित आहे तुम्ही खोटं बोलता, हे खोटं शपथपत्रात पकडलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपूटे लोक आहेत हे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

