Gadchiroli Hero Company Showroom Building Collapse: गडचिरोली येथे हिरो कंपनीच्या शोरुमची इमारती कोसळली. या अपघातात तीन जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे, तर तिघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.
आकाश ज्ञानेश्वर बुराडे (वय 25, रा. निलज, ता. ब्रम्हपुरी), तहसीन इस्राईल शेख (वय 30) व अफसान शेख (वय 32, दोघेही रा. देसाईगंज) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सौरभ चौधरी (वय 25, रा. मेंडकी), विलास मने (वय 50) व दीपक मेश्राम (वय 23, दोघेही रा. आरमोरी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
इमारत धोकादायक असतानाही शोरुम सुरु
आरमोरी येथे पंचायत समिती जवळच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीचं शोरुम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरुम सुरु होतं. आज तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते, तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी करण्यासाठी, नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
Himachal Pradesh: नियंत्रण सुटलं अन् स्विफ्ट कार खोल दरीत कोसळली, अख्खं कुटुंब संपलं, सहा जणांचा दुर्दैवी अंत
जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते. तिन्ही जखमींची हाडे तुटली असून, त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
काल 7 ऑगस्टला गडचिरोली नजीकच्या काटली येथे ट्रकने धडक दिल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज आरमोरीत इमारत दुर्घटनेत तीन जणांना प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सध्या याप्रकरणाचा तपस पोलिस करत आहेत.

