Manoj Jarange Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीला धरुन मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. २७ ऑगस्टला मराठ्यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. यासाठी जरांगेंनी मराठ्यांना ‘एक घर, एक गाडी’ अशा संकल्पेतून या असे आवाहन केले आहे. तर सरकारलाही पुन्हा अल्टिमेटम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सकाळी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठी आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांना कोणी काठीनेही डिवचायचं नाही.’
जरांगे पाटील म्हणाले, मुंबईकडे मोर्चा जाताना मराठा समाजाच्या पोरांना कोणी काठीने देखील डिवचायचं नाही. पोलिसांच्या बळावर मराठा समाज बांधवावर अन्याय अत्याचार करणे बंद करा. आम्ही शांततेत येणार आहे, याअगोदर आम्ही शांततेत आलो आणि गेलो होतो. मराठ्यांनी वादग्रस्त काहीही करायचं नाही, जाळपोळ दगडफेक अशा कृती करायच्या नाहीत. कुणी केलं तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, असेही जरांगेनी स्पष्ट सांगितले.
जरांगे पुढे म्हणाले, कोणीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेन, तो सरकारचा व्यक्ती असेल, असं समजू. राज्य सरकारने नाटकं करू नये. आंतरवली सराटी येथे जशी मारहाण केली, तशी मारहाण करायची नाही. तुमचं तर कार्यक्रमच होणार आहे. तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील बट्ट्याबोळ होणार आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

