कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातला हलवल्याने जनक्षोभ उसळला आहे. पुण्यात अजित पवारांच्या सभेत एका तरुणाने हा मुद्दा मांडून हत्तीणीला परत आणण्याची मागणी केली.
पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा सुरु होती. अजित पवारांचं भाषण सुरु असताना एका तरुणानं थेट माधुरी हत्तीणीचा विषय उपस्थित केला. हा तरुण व्यासपीठाच्या जवळच बसला होता. माधुरी हत्तीणीला आणा परत वनतारामधून. लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं तरुणानं ओरडून सांगितलं. ते ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण थांबवलं. त्यांनी तरुणाचा मुद्दा ऐकून घेतला आणि त्याला प्रतिसादही दिला.
काय रे, काय झालं, अशी विचारणा अजित पवारांनी तरुणाकडे केली. त्यावर माधुरी हत्ती , तिला वनतारामध्ये घेऊन गेले. ती कोल्हापूरची हत्तीण आहे. तिला घेऊन गेल्यानं लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं तरुण पुन्हा एकदा ओरडला आणि त्यानं त्याचा मुद्दा अजित पवारांपर्यंत पोहोचवला. त्यावर अरे माधुरी म्हणजे ती हत्तीण ना, असा सवाल केला. त्यावर तरुणानं होकारार्थी उत्तर दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार ांनी या प्रकरणातील न्यायालयीन बाबी सांगून तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘त्या माधुरी हत्तीणीबद्दल सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. आपण संविधान आणि कायद्यानं देश चालवतो. तुम्हाला, मला जगण्याचा अधिकार आहे. तसाच प्राणी, पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्या हत्तीणाला नेण्यात आलं,’ असं अजित पवारांनी तरुणाला सांगितलं. याला लईच हत्तीणीचं लागलंय बघा.. तुला एकदा कुठेतरी हत्तीणीवर बसवतो, असं अजित पवार पुढे गंमतीत म्हणाले. त्यानंतर सभास्थळी एकच हशा पिकला.

