Train Mega Block 3 August 2025 : येत्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर नियमित मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. या काळात अनेक गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे.
येत्या रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ०३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील ट्रेन माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. त्यानंतर त्या त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे पलीकडे जाणाऱ्या जलद ट्रेन मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील ट्रेन मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जाऊन मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्गावरही ब्लॉक
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० वाजेपासून ते दुपारी ०४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ वाजल्यापासून दुपारी ०३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील. तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून १०.१६ वाजल्यापासून ते दुपारी ०३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील ट्रेन रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी मार्गांदरम्यान विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० वाजल्यापासून संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

