विधिमंडळ अधिवेशनात रम्मी खेळल्याने आणि वादग्रस्त विधानांमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते बदलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.
कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटिलकी, पंचनामे काय ढेकळांचे करायचे का, अशी वादग्रस्त विधानं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सातत्यानं केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते मोबाईलवर रम्मी खेळताना दिसले. तेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आलं. त्यांनी याचं लंगडं समर्थन केलं. मी रम्मीची जाहिरात स्किप करत होतो, अशी सारवासारव त्यांनी केली. मी काय कोणाचा विनयभंग केलेला नाही, असंही ते बोलून गेले. शासन भिकारी असल्याचं वादग्रस्त विधान करत त्यांनी स्वत:च्या अडचणी आणखी वाढवून घेतल्या.
माणिकराव कोकाटे यांचे प्रताप पाहता त्यांच्याकडून कृषी विभागाची जबाबदारी काढून घेतली जाणार नाही. कृषी विभाग कोट्यवधी शेतकऱ्यांशी संबंधित असल्यानं या खात्यासाठी संवेदनशील नेत्याची गरज असते. पण कोकाटे ताळतंत्र सोडून बेताल विधानं करत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कृषी खातं काढून त्याच्या जागी कमी महत्त्वाचं खातं दिलं जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते काय म्हणाले?
सुत्रांच्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांना क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी दिला जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या हे मंत्रालय उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या दत्तामामा भरणे यांच्याकडे आहे. क्रीडा मंत्रालय मिळाल्यानं भरणे सुरुवातीला बरेच नाराज झाले होते. त्यांनी अनेक दिवस क्रीडा मंत्रालयाचा पदभारदेखील स्वीकारला नव्हता. पण आता कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांमुळे दत्तामामांना त्यांचं कृषी खातं मिळण्याची शक्यता आहे. तर कोकाटेंना दत्तामामांचं क्रीडा मंत्रालय दिलं जाण्याची शक्यता आहे. ही एक्स्चेंज ऑफर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

