Navi Mumbai News : गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नवी मुंबईतून समोर आली आहे. एक 35 वर्षीय शिक्षिकेने आपल्या दहावी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला व्हिडीओ कॉल केला. दोघांनी संभाषण केलं. यानंतर ही शिक्षिका व्हिडीओ कॉलवर अर्धनग्र झाली आणि तिने विद्यार्थ्यालादेखील कपडे काढायला लावले. हा संबंधित प्रकार विद्यार्थ्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.
संबंधित प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. एक शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यासोबत इतकं विकृत कसं वागू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय समाज म्हणून आता आपण कोणत्या दिशेला चाललोय? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. या अशा घटनांची आपण गंभीरतेने दखल घेणं आवश्यक आहे. मुलांचं योग्यप्रकारे समुपदेशन करायला हवं. यासोबतच अशा प्रकारच्या शिक्षकांनी देखील भान ठेवावं, याची जाणीव करुन द्यायला हवं. कारण संबंधित प्रकार अत्यंत किळसवाणा आहे.
नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबईतील रहिवासी आसलेल्या एका 35 वर्षीय महिला शिक्षिकेचे आपल्याच शाळेत शिकत असलेल्या इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसोबत मैत्री झाली. त्यांची मैत्री वाढली. यातूनच महिला शिक्षिकेने काल रात्री 9 वाजता मुलाला इंस्टाग्रामवर व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलमध्ये संबधित महिला आधी स्वतः अर्धनग्न झाली. त्यानंतर तिने मुलाला कपडे काढण्यास सांगितले.
पुढे घडलेल्या संपूर्ण व्हिडीओची मुलाने स्क्रीन रेकॉर्डिंग केली. ही स्क्रीन व्हिडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या आईच्या हाती लागली. तिने तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन संबंधित महिले विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी बालकांच्या लैंगिक अत्याचारा कलमाखाली संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र सबंधित घटनेने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षिकेला पोलीस कोठडी
पालकांच्या तक्रारीनुसार, शिक्षिकेच्या या वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षिकेला ताब्यात घेतले आणि तिच्यावर गंभीर गुन्हा नोंदवला. आरोपी शिक्षिकेला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोपरखैरणे पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासामध्ये शिक्षिकेने यापूर्वी इतर कोणत्याही विद्यार्थ्यांसोबत असे प्रकार केले आहेत का? तिच्या मोबाईल फोनमधून किंवा सोशल मीडिया अकाऊंटवरून आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे मिळतात का? याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी शिक्षिकेचा मोबाईल फोन जप्त केला असून त्याचा तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व पालकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. मुलांच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरावर पालकांनी लक्ष ठेवावे. तसेच, अशा प्रकारचे कोणतेही गैरप्रकार किंवा संशयास्पद वर्तन आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

