• Tue. Mar 17th, 2026

    शालेय शिक्षणात मोठे बदल, तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा हद्दपार, नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय?

    शालेय शिक्षणात मोठे बदल, तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा हद्दपार, नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय?

    Big Changes in School Education : राज्य सरकारने शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. यात इयत्ता तिसरी ते दहावीसाठी तिसरी भाषा आता नसेल. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय असतील. ‘एससीईआरटी’ने हा अभ्यासक्रम तयार केला असून, नागरिकांना अभिप्राय देता येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने आता आपल्या भूमिकेपासून फारकत घेऊन इयत्ता तिसरी ते दहावीच्या प्रस्तावित अभ्यासक्रमातूनही तिसरी भाषा हद्दपार केली आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र; तसेच कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्य शिक्षणाचे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.

    राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेला हा ‘अभ्यासक्रम मसुदा www.maa.ac.in २०२५’ या वेबसाइटवर उपलब्ध असून, २८ जुलैपासून नागरिकांना अभिप्राय देता येणार आहे, अशी माहिती ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली. सध्या तिसरी ते पाचवीसाठी असणाऱ्या ‘परिसर अभ्यास’ विषयाऐवजी ‘आपल्या सभोवतालचे जग (भाग एक, दोन) विषय असेल. चौथीसाठीचे विद्यमान पाठ्यपुस्तक ‘शिवछत्रपती’ आहे तसेच राहील. तिसरीसाठी जिल्हा, चौथीसाठी राज्य आणि पाचवीसाठी देश अशा पद्धतीने आशय आहे. इयत्ता अकरावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर त्याआधारे राज्य मंडळाच्या अकरावी, बारावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येईल.
    Supriya Sule : सुप्रिया सुळे रोहिणी खडसेंच्या बाजूने बोलल्या, ससून रुग्णलयाच्या रिपोर्टबाबतही केला मोठा दावा

    नव्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय ?

    • इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचे स्वतंत्र विषय
    • नववी-दहावीसाठी आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांसारख्या नवकल्पना.
    • इयत्तानिहाय भारतीय ज्ञान प्रणाली, राज्यघटनात्मक मूल्ये, शाश्वत विकास, सामाजिक समावेशन आणि उद्योजकता कौशल्य यांचा समावेश

    Pune Rave Party News: रेव्ह पार्टीतून उचललं, खडसेंच्या जावयाला घरी नेऊन तिथंही झाडाझडती, छाप्यात काय-काय सापडलं?

    त्रिभाषा सूत्राबाबत काय ?

    डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरण अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली. तिच्या शिफारशींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत सध्याची अभ्यासक्रम प्रणाली आहे तशी सुरू राहील, असे ‘एससीईआरटी’कडून सांगण्यात आले. मराठी भाषेचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर, मराठी भाषेचा आधार घेऊन अन्य प्रथम व द्वितीय स्तराच्या भारतीय भाषांचा अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात येईल.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा