Eknath Khadse Press Conference : गिरीश महाजन यांनी काल एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांना शिवीगाळ केली होती. खडसेंनी फक्त आपल्या स्वत:च्या कुटुंबाचं हित जपलं, अशी टीका चव्हाण यांनी केली होती. तसेच एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते, असा गंभीर आरोप मंगेश चव्हाण यांनी केला. त्यांच्या आरोपांना आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
“मला आपल्या आमदारांवर फार बोलायचं नाहीय कारण ते आमदार मीच वाढवले आहेत. मीच ते आमदार घडवले आहेत. आपलेच पोरं आहेत. त्यांच्याकडून कधी चुका घडतात तर कधी गौरवही करतात. ते नंतर त्यांच्या संदर्भात समाजासमोर जावून मांडू”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“मूळ प्रश्न असा आहे की, त्यांचा पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद मुळामध्ये हनीट्रॅप प्रकरण आणि प्रफुल्ल लोढा याला अटक करण्याबाबत होती. पण त्याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. फक्त नाथाभाऊला टार्गेट करत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगेश चव्हाण यांनी चारित्र्याचा सर्वात मोठा आरोप नाथाभाऊंवर केला. मी 1980 पासून सक्रिय राजकारणात आहे. भाजपातदेखील काम करतोय. भाजप पक्ष संघटनात्मक असेल, सहकार क्षेत्र असेल, जिल्हा बँक असेल, अशा अनेक ठिकाणी काम केलं”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“गिरीश भाऊ म्हणतो मी 35 वर्षाचा असताना आमदार झालो. मी 36 व्या वर्षात झालो. कारण मी विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळे त्यापेक्षा मी एक वर्ष जास्त आहे. गिरीश महाजन मंत्री आहेत. ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत. मी आतापर्यंत 12 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकार आल्यावर 6 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. मी 18 खात्यांच कॅबिनेटपद भोगलं आहे. गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाही”, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी खिल्ली उडवली.
“मूळ प्रश्न असा आहे की, मी मंगेश चव्हाण यांना आव्हान देतो. माझ्या विषयी पुराव्यानिशी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तर ती समाजाला दाखवा. गप्पा काय मारता? माझ्यासमोर दाखवा. मी राजकारणातून निवृत्त होईन. एक शब्द काढणार नाही. बाकी मी असा राजकारणातून निवृत्त होणार नाही. जनमाणसाचा प्रतिनिधी आहे”, असं खडसेंनी ठणकावून सांगितलं.
“मी 45 वर्षे जनमाणसात काम केलं आहे. जनतेचे प्रश्न विधानसभेत प्रखरपणे मांडलेले आहेत. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे साऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे अधिकार मला जनतेने दिले आहेत. जोपर्यंत मी राजकारणात आहे तोपर्यंत मी जनतेचे प्रश्न मांडणार आहे, भांडणार आहे, चालू ठेवणार आहे. तुम्ही पुरावे द्या, मी राजकारणातून निवृत्ती घेईन”, असं चॅलेंज एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिलं.

