Eknath Khadse Challenge to Girish Mahajan : एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी गिरीश महाजन यांना चॅलेंज दिलं आहे. आपल्या संपत्तीची पाच वेळा चौकशी झाली. तशी गिरीश महाजन यांनी स्वत:च्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश द्यावेत, असं चॅलेंज खडसेंनी दिलं आहे. तसेच आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात सातत्याने प्रश्न उपस्थित करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. खरंच दम असेल तर मुलाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, असं देखील चॅलेंज एकनाथ खडसे यांनी दिलं आहे.
“गिरीश महाजन यांचं नाव वारंवार महिलांच्या संदर्भात का येतं? हा माझ्यासमोर प्रश्न आहे. गिरीश महाजन म्हणतात माझं नाव घेतो. कार्यकर्ते म्हणतात, गिरीश महाजनांचं नाव घेता. मी घेतच नाही बाबा. पहिल्यादा असं आहे की, प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजन यांच्यासंदर्भात म्हटलं आहे की, त्यांचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी एक बटण दाबलं तर हिंदुस्तानात तहलाक माजेल, हे त्यांचे शब्द आहेत. मग प्रफुल्ल लोढा यांनी गिरीश महाजन यांचं नाव का घेतलं?”, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
“मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप मी केला नव्हता. अनिल थत्ते नावाच्या एका पत्रकाराने केला होता. पण त्यांनाही गिरीश महाजनांचे नाव एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत जोडावे असं का वाटले असेल?”, असा देखील सवाल खडसेंनी केला.
“तिसरं महत्त्वाचं असं आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं आहे. अजित पवार गिरीश महाजन यांना भर सभागृहात म्हणाले होते की, काका तुम्ही बसा खाली नाहीतर मला काकींना सांगावं लागेल की, तुमच्यामागे किती काकी आहेत. किती काकी आहेत असं अजित पवारांनी का म्हटलं?”, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.
“हा प्रफुल्ल लोढा तुमच्या ताब्यात आहे. सरकार हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा. हनीट्रॅपच्या विषयावर बोलाना. त्याचा शोध घ्या”, असं आवाहन खडसेंनी केलं.
‘असेल तुझ्यात खरी ताकद तर…’
“गिरीश महाजनांना मी चॅलेंज देतो. माझ्या मुलाच्या संदर्भात बोलताना हत्या आहे की आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले. मी आधीच चॅलेंजने सांगतो, मला मंगेश चव्हाण सारखं खालच्या स्तरावर बोलता येत नाही. मी त्यांना अजून चॅलेंज देतो. असेल तुझ्यात खरी ताकद तर माझ्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी करा”, असं चॅलेंज एकनाथ खडसे यांनी दिलं.
‘मी चॅलेंज देतो, तुमच्या संपत्तीची चौकशी होऊ द्या’
“मी आयुष्यभर चारित्र्य जपलं आहे. मी तासंतास गप्पा केल्या आहेत. पण माझ्या मुलींशी केल्या आहेत. दुसऱ्यांच्या मुलीशी गप्पा केल्या नाहीत. तुम्ही कसल्या गप्पा केल्या ते साऱ्या जनतेला माहिती आहे. माझ्या संपत्तीची पाच वेळा चौकशी झाली. दोन वेळा इनकम टॅक्सने केली, दोन वेळा एसीबीने आणि एक वेळा ईडीने केली. सर्व चौकशी कायदेशीर आणि योग्य आहे. सर्व नियमित असल्याचं सर्टिफिकेट त्यांनी दिलं आहे. आता मी चॅलेंज देतो, तुमच्या संपत्तीची चौकशी होऊ द्या”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

