• Sat. Aug 15th, 2026

जलसंधारण, शेतकऱ्यांच्या मदतीवर भर – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

अमरावती, दि. १५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३०८ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यासोबतच जलसंधारणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. येत्या काळातही जलसंधारण आणि शेतकऱ्यांना मदतीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे यांनी, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ‘जलसंधारण अभियान’ राबवले जाणार आहे. तसेच, २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच काही भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, म्हणून कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.

शिक्षण क्षेत्रातही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्रप्रमुख पदांची भरती करण्यात आली आहे तसेच पवित्र पोर्टलद्वारे ३० हजार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. २६ जानेवारी रोजी २ कोटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि ग्राम विकासासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पांदण रस्त्यांसाठी निधी देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्‍यांचे वहीवाटीचे रस्ते उपलब्ध करून होणार आहे. चिखलदरा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. येथील स्कायवॉकचे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विधि अधिकारी नरेंद्र बोहरा, पोलीस उपअधीक्षक तयुब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षणच्या पोलीस अधीक्षक अनिता पाटील, पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलीस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबर्ते, दिपमाला साळुंखे, अतुल कडू, प्रदिप बद्रे, मिलींद बेलसरे, हरीना नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे, दिया पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा, साक्षरतेची शपथ घेण्यात आली. तसेच जलसंधारणाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed