Jitendra Awhad on Beed Protestor Women Death : केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीविरोधात उपोषणाला बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी याबद्दल ट्विट करत ‘हा राजकीय खूनच’ असल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विटसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक महिला आक्रोश करताना दिसत आहे. आव्हाड म्हणाले, ‘केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे निधन झाले. ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे. कंत्राटदार हर्षल पाटील नंतर हा देखील राजकीय खूनच आहे.’
जितेंद्र आव्हाडांनी असेही नमूद केले की, सदर महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने विजेच्या वायर ओढून नेल्या होत्या. त्याविरोधात सदरील महिला उपोषण करत होती. मयत महिलेने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली. पण ‘आमच्या अखत्यारीत हे प्रकरण येत नाही,’ असं पत्र तहसीलदाराने सदरील महिलेस दिले, अशी प्राथमिक माहिती आहे. अखेर शेवटचा उपाय म्हणून ही महिला उपोषणाला बसली असताना तिचा जीव गेला. आत्महत्या करत आधी शेतकरी आपला जीव देतच होते. पण आता उपोषण करताना देखील त्याचे जीव जात आहेत. कृषिप्रधान देशाला काळिमा फासणारी ही घटना आहे.
आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरु केले आहे. पण याचदरम्यान उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आता शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपोषण सोडून आम्ही अंत्यविधीला जाणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी महिलेचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर उपोषणाच्या ठिकाणीच आणून ठेवला आणि कंपनीचा निषेध केला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडानंतर इतरांनीही या घटनेचे व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत सरकारला जाब विचारला आहे. तसेच सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत आहेत.

