Shirdi News : शिर्डीमध्ये साईबाबांविरुद्ध आक्षेपार्ह विधानं केल्याने वाद निर्माण झाला आहे. संत युवराज नावाच्या साधूने साईबाबांवर टीका केली, ज्यामुळे साईभक्त नाराज झाले आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी साईबाबा संस्थान पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. संत युवराज यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
या व्हिडिओमध्ये तलवारवाला बाबा अर्थात संत युवराजने अत्यंत खालच्या पातळीची आणि प्रक्षोभक भाषा वापरत साईबाबांचा उल्लेख “मुस्लिम” आणि “व्यभिचारी” अशा अश्लाघ्य शब्दांत केला आहे. इतकेच नव्हे, तर देशभरातील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवाव्यात आणि त्या मूर्ती हातोड्याने फोडून गटारीत टाकाव्यात, असे उघड आवाहन त्यांनी केल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक साईभक्तांनी संत युवराजच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत, यामागे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा घृणास्पद हेतू असल्याचा आरोप केला आहे.
साईबाबा हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांवर अशा प्रकारची टीका करणे हा समाजातील शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न मानला जात आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता साईभक्त, विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडूनही याची गंभीर दखल घेतली गेली असून, व्हिडिओच्या सत्यतेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून, धार्मिक तेढ पसरवणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल, असे पोलिसांनी संकेत दिले आहेत.
कारवाई करण्याची मागणी
साईबाबांच्या दरबारात देशभरातील संत महंत दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मोठे नेते साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा अधिकार कुणालाही नाही. साईबाबांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या विरोधात साईबाबा संस्थानने कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही संस्थानकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा साई संस्थानचे माजी विश्वस्त शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.

