Eknath Khadse : राज्यात हनीट्रॅप प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना पोलिसांनी अटक केली आहे. एकनाथ खडसे यांनी लोढा आणि महाजन यांच्या संबंधांवर गंभीर आरोप केले आहेत. लोढा यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी खडसेंनी सरकारकडे केली आहे.
“प्रफुल्ल लोढाच्या तेव्हाच्या व्हिडीओ रेकॉर्डमध्ये म्हटलेलं आहे की, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, त्याला धमकी दिली जाते. तो म्हणतो मला ब्लॅकमेल करु नका. एक बटण दाबलं तर सारं उघडकीस येईल, त्याचबरोबर तुम्ही ट्रायडेंट हॉटेलला तीन महिने पाय चाटत होते, मी साऱ्या जागाला सांगेन की तुम्ही ट्रायडेंट हॉटेलला काय काय केलं”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
“मधल्या कालखंडात इतका दुरावा झाल्यानंतर अलिकडच्या काळात प्रफुल्ल लोढा याला भाजपात प्रवेश दिला गेला. ते सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीश महाजनांचे पेढा भरवतानचे देखील फोटो आहेत. त्यावेळेस असं काय घडलं की, जो शिवीगाळ करत होता ते एकत्र आले. त्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश झाला. तसेच लोढाची एवढी कोटी संपत्ती वाढली कशी? याचा देखील तपास व्हायला हवा”, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
प्रफुल्ल लोढावर दोन गुन्हे
“अंधेरी आणि साकीनाका येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहे. पहिला गुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा पोस्को अंतर्गत गुन्हा आहे. आणखी एक अश्लील फोटो काढले संदर्भातला आहे. तर दुसरा गुन्हा हा हनीट्रॅप संदर्भातला आहे. त्या गुन्ह्या संदर्भात त्याला अटक झाली. तो आता जामीनासाठी प्रयत्न करत आहे. अशा माणसाला भाजपात घेणं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश देणं असे बरेचशे विषय येतात”, असं खडसे म्हणाले.
‘ठाकरे सरकारमध्येही लोढाची चौकशी झाली’
“माझ्या माहितीप्रमाणे, प्रफुल्ल लोढाकडे अशा स्वरुपाचे काही फोटो वगैरे आहेत, अशा संशयावरुन ठाकरे सरकारच्या काळात त्याच्या घरादाराची चौकशी झाली होती. ती सीडी किंवा ते सगळं शोधण्यासाठी असेल, पण त्याच्या नंतरच्या काळात 15 दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरी परत पोलिसांनी रेड टाकली होती. ती रेड कशासाठी टाकली हे पोलिसांच्या तपासातून बाहेर येऊ शकेल. हे प्रकरण त्या 72 अधिकाऱ्यांचं नाही. हनीट्र्रपिंगचा विषय वेगळा आहे. यामध्ये अनेक राजकीय व्यक्ती असण्याचा संशय आहे”, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
‘देवेंद्र फडणवीस नक्की खोलात जाऊन चौकशी करतील, असा मला विश्वास ‘
“तपास पारदर्शक होईल, या विषयी माझ्या मनात शंका आहे. तरीही अशा प्रकरणात जे अश्लील आहे, ज्यामध्ये महिलांचे संबंध आहेत, अशा प्रकरणात देवेंद्र फडणवीस नक्की खोलात जाऊन चौकशी करतील, असा मला विश्वास आहे. कारण महिलांचा विषय आहे. अश्लील विषय आहे. जेवढं खोदाल तेवढं यातून जास्तीत जास्त बाहेर येऊ शकतं. म्हणून माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करावी. त्या माध्यमातून खोलवर जावं”, अशी विनंती एकनाथ खडसे यांनी केली.
“प्रफुल्ल लोढाकडून सगळे पुरावे काढावे. त्यामध्ये कोण कोण आहे याची माहिती घ्यावी. मला त्यामध्ये कोण कोण आहे ते माहिती आहे. पण मी दाव्यानिशी सांगू शकत नाही. या प्रकरणाचे धागेदोरे गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचतील असं आज बोलू शकत नाही. पण पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपास करावा, अशी मी विनंती करतो”, असंदेखील एकनाथ खडसे म्हणाले.

