Madha News: माढा तालुक्यातील अरण येथे धक्कादायक घटना घडली असून कार्तिक खंडागळे या दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका कोरड्या कॅनलमध्ये आढळला. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिकची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
शनिवारी सकाळी तुळशी मोडलिंब रस्त्यावर जाधव वाडीजवळ सीना माढा उपसा सिंचनच्या कोरड्या कालव्यात कार्तिकचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सांगितले की, कार्तिकची हत्या इतरत्र कोठे तरी करून त्याचा मृतदेह कालव्यात आणून टाकला असावा. मृतदेह चार दिवसांपूर्वीचा असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
मंगळवेढ्यातील खून झालेल्या महिलेचं गूढ उकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे किरण-निशांतचं बिंग फुटलं
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी रक्ताने माखलेले दगड सापडले आहेत. ते पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच, घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर एक चाकूही सापडला आहे. पोलिसांनी कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो तपासणीसाठी पाठवला. कार्तिकच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आमच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. खुनी आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करू.”
दरम्यान, कार्तिकच्या पायाला काळा दोरा बांधलेला होता आणि अंगावर असलेले कपडे पाहून त्याच्या आई-वडिलांना कार्तिकची ओळख पडली. मुलाचा कुजलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे असून अनेक लोक कार्तिकचा नरबळी झाला असावा, अशी शंका व्यक्त करत आहेत.

