Raigad Accident : रायगड-महाड मार्गावर घरोशी वाडी येथे झालेल्या खाजगी बस अपघातात 11 प्रवासी जखमी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन बस पुण्याला निघाली होती, परंतु वेगात असताना बस उलटली. पाचाड आरोग्य केंद्रात जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. प्रवाशांना किरकोळ जखमा असल्याने उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
किल्ले रायगडवर पावसाळी पर्यटन करून पुण्याकडे परतणाऱ्या खाजगी आराम बस क्रमांक MH 14 KA 7245 या गाडीचा महाडच्या हद्दीवर घरोशी वाडी येथे दुपारी चारच्या सुमारास मोठा अपघात घडला. बसमधून प्रवास करणाऱ्या 32 प्रवाशांपैकी 11 जण जखमी झाल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
या अपघाताचे वृत्त समजतात महाड तालुका पोलीस स्टेशन आणि पाचाड दूर क्षेत्र स्थानकातील पोलीस स्टेशनच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवासी वर्गाला तातडीने प्राथमिक केंद्रामध्ये आणण्याची सुरुवात केली. पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शैलेश मालदे यांनी यासंदर्भात जखमी असलेले प्रवासी यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधींशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या सूत्रांनी दिली आहे.
जखमी प्रवाशांची नावे
अनिकेत आघाव (२२ वर्ष), किरण घाविल (२९ वर्ष), आशिष अंभोरे (२४ वर्ष), तुकाराम चोपडे (२० वर्ष), भीमा कांबळे (२१ वर्ष), तुळशीराम यादव (१९ वर्ष), शिवानी जाधव (२३ वर्ष), जानवी पारकर (२४ वर्ष), माधुरी ठोकळ (२० वर्ष), दिव्या अहिल्या (२९ वर्ष), तेजस पाटील आदी प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

