• Sat. Mar 14th, 2026

    अर्वाच्य शिवीगाळ, लाथा-बुक्क्यांनी मारलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण

    अर्वाच्य शिवीगाळ, लाथा-बुक्क्यांनी मारलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण

    Latur Clash : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली. पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. सुनील तटकरे यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेचे समर्थन केले नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    लातूर : महाराष्ट्राचं राजकारण आता फार भयानक आणि विचित्र मार्गावर जाताना दिसत आहे. महाराष्ट्रातलं राजकारण राडेबाजी, दांडगायीच्या आणि अराजकतेच्या मार्गावर जाताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात भर विधान भवनात राडा झाला. दोन आमदारांचे समर्थक भर विधान भवनात समोरासमोर आल्याची बातमी ताजी असताना लातूरमध्ये पुन्हा राड्याची घटना घडली आहे. महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली आहे. राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने प्रचंड शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. हे व्हिडीओ मन सुन्न करणारे आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे स्वत: तिथे मारहाण करत होते.

    नेमकं काय घडलं?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. विधीमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे आपल्या मोबाईलमध्ये रम्मी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचा झोड उठत आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर आलेली ती जाहिरात होती तिला स्किप करत असतानाचं ते कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण याच घटनेचे राज्यभरात पडसाद पडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज लातूरमध्ये दाखल झाले होते. ते लातूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. याचवेळी भर पत्रकार परिषदेत छावा संघटनेते कार्यकर्ते तिथे आले आणि आक्रमक झाले. त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधीमंडळ हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि कायदा करण्याचं सर्वोच्च सभागृह असल्याचं म्हणत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले. यावेळी सुनील तटकरे यांनी शांतपणे त्यांच्याकडून निवेदन घेतलं. पण त्यानंतर मोठा राडा झाला.

    सुनील तटकरेंची पत्रकार परिषद संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेरलं. त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. छावाच्या कार्यकर्त्यांना रक्तबंबाळ करेपर्यंत ही मारहाण होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे युवा नेते सूरज चव्हाण हे स्वत: मारहाण करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर व्हिडीओत काही कार्यकर्ते थेट खुर्ची भिरकावतानादेखील दिसत आहेत.

    सुनील तटकरे काय म्हणाले?

    या मारहाणीच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अशी काही घटना घडली असेल तर ती अत्यंत चूक आहे. मी या घटनेचं समर्थन करणार नाही. मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे. चर्चेतून, देवाणघेवाणमधून अनेक प्रश्न सुटत असतात. ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले. मी शांतपणे ऐकून घेतलं. ही घटना नींदनीय आहे. चूक घडली त्याबद्दल नाराजगी व्यक्त करतो. मी या घटनेचं समर्थन करणार नाही. मी आयुष्यात चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा