Vijay Wadettiwar Big Claim About Honey Trap : महाराष्ट्रामध्ये हनीट्रॅप प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभेत या मुद्यावरून गदारोळ झाला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत पुरावा असल्याचा दावा केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनीट्रॅपचा दावा फेटाळला. यानंतर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाबाबत आपल्याकडे गंभीर माहिती असल्याचं सांगितलं. राज्यात तीन वर्षांपूर्वी जे सत्तांतर झालं होतं ते हनीट्रॅपच्या ‘त्या’ सीडीतून झालं होतं, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनीट्रॅपबाबत प्रतिक्रिया दिली. हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे आणि विरोधी पक्ष नेत्यांकडे आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही. म्हणून आपण चूप आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्या प्रकरणामुळे आलं. शिंदेंच्या सरकार आलं, जे सत्तापालट झालं ते सीडीमुळे झालं. एवढं मोठं ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक मोठी माणसं त्यात आहेत. त्यावर खूप बोलण्याची गरज नाही”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
“आम्ही ती माहिती उघड केली तर लोकांना पाहण्यासाठी तिकीट लावावं लागेल, आणि ती खास आमंत्रित लोकांनाच दाखवली जाईल, इतकी ती गंभीर आहे. ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपये असं तिकीटच लावावं लागेल. ते तिकीट लावूनच सर्व चित्र दाखवावं लागेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हनी ट्रॅपचे केंद्र, नाना पटोले यांचा आरोप
दरम्यान, याच विषयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत गुरुवारी मोठा आरोप केला होता की, मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र बनले आहेत. यासंदर्भात त्यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवत पुरावा असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावत त्याची खिल्ली उडवली होती. “नाना पटोलेंचा बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

