Raj Thackeray Speech : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोड येथील सभेत मुंबईला ‘हात’ लावण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा दावा केला. अमराठी मतदारसंघ बनवून, मराठी माणसांना दूर फेकण्याचा डाव असल्याचं ते म्हणाले. हा सगळा प्रकार मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषिकांनी सतर्क राहून महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे उभी करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
“हे मतदारसंघ बनवून तुम्हाला लांब फेकून देणार आणि नंतर सांगणार आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचाच महापौर असं करुन हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा आख्खाचा आख्खा पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरु आहेत. हे आज नाही, पूर्वीपासून सुरु आहे. पूर्वी त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. पण आज लपूनछपून या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. हे काय षडयंत्र आहे ते आपण नीट ओळखा. समजून घ्या. हा सहज आलेला माज नाहीय. हे तुमच्या अंगावर येतात आणि बोलतात मराठी नाही बोलणार, हा माज तिथून आलेला आहे”, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांचं मराठी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
“तुम्ही सतर्क असले पाहिजेत. आज प्रकरण उसळलं म्हणून जागे व्हायचं आणि उद्या झोपून जायचं, आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय. अहो भुसभुशीत जमीन असते ना, तिथे घुशी होतात. खडकामध्ये घुशी होत नाहीत. तुम्ही खडकासारखे कडक असले पाहिजेत. तुम्ही महाराष्ट्राची भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजे. महाराष्ट्र काय हे समजून घेतलं पाहिजे”, असं आवाहन राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना केलं.

