NCP Sharad Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे बदल झाले आहेत. शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच, आमदार रोहित पवार यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तसेच, सुनील भुसारा यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबबत घोषणा केली. यावेळी रोहित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आलं.
रोहित पवार यांना प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना पुष्पगुच्छ देत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुनील भुसारा यांनादेखील पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील भुसारा यांना उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
“आम्ही भविष्य काळामध्ये वाटचाल करण्याच्या संदर्भात नियोजन करणार आहोत. नवीन काही लोकांना जबाबदारी द्याव्या, चळवळीतून हा पक्ष आक्रमक पद्धतीने उभा राहावा म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून आमचा युवा नेता रोहित पवार यांची निवड करत आहोत. अधिवासी विभागातील नेतृत्व करणारे आमचे सहकारी सुनील भुसारा यांनासुद्धा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देत आहोत. प्राध्यापक असल्या तरी इतर समाजाच्या बांधवांसाठी, शरद पवारांचा विचार प्रखरपणे मांडणाऱ्या कविता नेत्रे यांना राज्याच्या महिला उपाध्यक्षपदाची जबाबदारी देत आहोत”, अशी घोषणा शशिकांत शिंदे यांनी केली.
“या नियुक्त्या झाल्यानंतर जुन्या नियुक्त्यांचं काय? असा प्रश्न पडला असेल तर तो बाजूला करा. पूर्वीची कमिटी सक्षमतेने तशीच राहील. या कमिटीत काही फेरबदल करायचे राहतील तर सर्वांच्या सहमतीने आपण निर्णय घेऊ. नव्या जुन्यांचं मिश्रण करुन एक चांगल्याप्रकारची संघटना उभी करण्याचा प्रयत्न आपण करतोय”, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
Rohit Pawar : वेळ चुकली अन् काकांची भेट हुकली, अजित पवार शरद पवारांना भेटले, रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
यावेळी रोहित पवारांनी देखील प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. “मी शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि सर्व मोठे नेत्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर आपण मोठी जाबबादीर दिली आहे. आपण ज्याप्रकारे शिव, शाहू, आंबेडकरांच्या विचारांने पुढे चाललात. शरद पवार यांच्या विचाराने पुढे चाललात, तुम्ही विचारांबरोबर आणि शरद पवार यांच्यासोबत राहिलात, तसाच मी सुद्धा असेन. याच्यामुळे आणखी ताकदीने आपण सर्वजण लढुयात अशी ग्वाही देतो. आपण आक्रमक पद्धतीने येत्या काळात काम करुयात. आपल्याला सर्व फ्रंटल सेलला खऱ्या अर्थाने ताकद द्यावी लागले. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला प्रदेशाध्यक्ष ताकद देतील. आपण सर्व सोबत लढुयात”, अशी भूमिका रोहित पवारांनी यावेळी मांडली.

