• Fri. Jun 19th, 2026
    Nagpur News: नागपुरात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने आयुष्य संपवलं, अंतरवस्त्राच्या इलास्टिकने घेतला स्वत:चा जीव

    Nagpur Jail Prisoner Ends Life: नागपूर मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानाने अंतरवस्त्राच्या इलास्टिकने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूर सेंट्रल जेल पुन्हा एकदा कैद्यांच्या सुरक्षेवर आणि मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनेमुळे चर्चेत आलं आहे. हत्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहाच्या आवारातच गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेमुळे तुरुंग प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

    धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कैद्याचं नाव तुलसीराम शेंडे (वय 54) असे असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. भंडाऱ्यात एका हत्या प्रकरणात दोषी आढळल्याने 30 जून 2024 रोजी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती.
    Nagpur News: मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आई-बाबा, पण बस… नागपुरात NEET च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
    तुलसीराम शेंडे हा मध्यवर्ती कारागृहातील ‘छोटी गोल बैरक’ परिसरात असलेल्या ‘रंग काम विभाग’जवळील गोदामाजवळ एका खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस तपासानुसार, त्याने आपल्या अंडरवेअरच्या इलास्टिकचा वापर फास तयार करण्यासाठी केला होता. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच ही बाब धंतोली पोलिसांना कळविण्यात आली.

    पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आता हे शोधत आहेत की, नेमक्या कोणत्या मानसिक, सामाजिक अथवा वैयक्तिक कारणांमुळे तुलसीराम शेंडेने असा टोकाचा निर्णय घेतला.

    ही घटना अशा काळात घडली आहे, जेव्हा देशभरातील तुरुंग व्यवस्थेत कैद्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर, त्यांच्यावर होणाऱ्या ताणतणावावर आणि आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर सातत्याने चर्चा सुरू आहे. विशेषतः नागपूर सेंट्रल जेलमध्ये काही महिन्यांपूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे जेल प्रशासनावर कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षता बाळगण्याचा दबाव वाढला आहे.

    कैद्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यासाठी आवश्यक असलेली समुपदेशनाची (काउन्सेलिंग) सुविधा प्रभावीपणे राबवण्यावर आता पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. तुरुंगातील कडक शिस्त, अस्वस्थता, कुटुंबापासून दुरावा, आणि शिक्षेच्या भीतीमुळे कैद्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा ताण येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुलसीराम शेंडेच्या आत्महत्येने पुन्हा एकदा या व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकला असून, कारागृह प्रशासनाने तत्काळ सुधारात्मक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा